सोलापूर : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७९ हजार ४४० शेतकरी बाधित झाले असून, ६७ हजार १९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल कर्मचारी, तसेच कृषी कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, नुकसानभरपाईसाठी ६० कोटी १८ लाख रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
१५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात ५१७ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात ६१२ मिलिमीटर झाला. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, माढा, मोहोळ आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ७९ हजार ४२० शेतकऱ्यांचे ६७ हजार १९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये उडीद, सोयाबीन व फळबागांचा समावेश आहे. शासन निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी एकूण ६० कोटी १८ लाख १ हजार ९२५ रुपयांचा निधी सोलापूर जिल्ह्यासाठी आवश्यक आहे. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी जिरायत शेतीसाठी ६ हजार ८०० रुपये, फळबागांसाठी १८ हजार रुपये आणि बागायत क्षेत्रांसाठी १३ हजार ५०० रुपये, अशी मदत शासनाकडून मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरासरी हेक्टरी १० ते २५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.
एका शेतकऱ्याचा मृत्यू
अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, अनेक जनावरे दगावली आहेत. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत मिळावी, तसेच यासह मृत जनावरांच्या नुकसानभरपाईसाठी एकूण ११ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.