सोलापूर : आता ऑटो रिक्षाने प्रवास करण्यासाठी पहिल्या दीड किलोमीटर प्रवासासाठी अगोदर खिशात २३ रुपये ठेवा मगच बसा. कारण परिवहन रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर प्राधिकरणाने नुकतीच १८ रुपये पहिल्या दीड किलोमीटरसाठी दरवाढ जाहीर केली होती. ती मान्य न करता फेरप्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आणि त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरला १५ रुपये अशी दरवाढ सुचवली आहे.
गेल्या बारा वर्षांपासून महागाई वाढूनही रिक्षाचे प्रवासभाडे वाढले नसल्याने रिक्षाचालक कृती समितीचा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. आंदोलने, बंदही पुकारला होता. याची दखल घेऊन बैठक घेण्यात आली होती. त्यात रिक्षाचालकांची प्रतिकिलोमीटर ३० रुपयांची मागणी होती, मात्र प्रत्यक्षात बैठकीत पहिल्या दीड किलोमीटर प्रवासासाठी १८ रुपये दरवाढ सुचवली होती. ती मान्य न करता रिक्षा संघटनांनी याचा निषेध करीत आरटीओ प्रशासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता. यात ही दरवाढ तुटपुंजी असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आरटीओ प्रशासनाने हा प्रस्ताव परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता.
यावर परिवहन प्राधिकरणाकडून साधकबाधक चर्चा होऊन तीन आसनी ऑटो रिक्षांसाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपयांची दरवाढ सुचवली आहे. त्यानंतर पुढील किलोमीटरसाठी १५ रुपये आकारता येईल, असे म्हटले आहे. ही दरवाढ १८ जुलैपासून अंमलात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
----
काय झाला नव्याने निर्णय
रिक्षाच्या नव्या दरवाढीनुसार महानगरपालिका क्षेत्रातील रिक्षांसाठी रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीसाठी २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे. लगेजसाठी ५ रुपये आकारता येईल. ग्रामीण भागातील रिक्षांसाठी या कालावधीसाठी ४० टक्के भाडे अतिरक्त आकारता येणार आहे.
---
मीटर पुन:प्रमाणीकरण करा
- दरवाढ झाल्यापासून ९० दिवसांच्या आता मीटर पुन:प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. म्हणजे सध्या मीटरमध्ये नव्या दरवाढीचा समावेश संबंधित मेकॅनिककडून करून घ्यावा लागणार आहे. आणि त्याचे शासकीय तंत्रनिकेतन येथील संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे. जे रिक्षाचालक याची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सुधारित दरवाढीचा अंमल करता येणार नाही.
---
आम्ही गेली अनेक दिवसांपासून केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र यापुढे हकमी समितीच्या शिफारशीनुसार भाड्याचे रिव्हिजन होऊन दरवाढ व्हावी एवढीच अपेक्षा आहे.
- सलीम मुल्ला, समन्वयक, रिक्षाचालक कृती समिती
---