सोलापूर : नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी येताना व जाताना सीट बेल्ट न लावता नियमाचा भंग केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व सहाय्यक पोलीस आयुक्त रूपाली दरेकर यांच्या गाडीवरील चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उपायुक्त दीपाली धाटे यांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दखल घेऊन ही कारवाई केली.
सध्या शहर व जिल्ह्यात ३२वा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखा, ग्रामीण वाहतूक शाखा व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे नियम या विषयावर प्रबोधन केले जात आहे. एकीकडे ही मोहीम सर्वत्र सुरू असताना दुसरीकडे सोलापूर शहरात पालकमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीला जाताना व येताना पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा) यांच्या चालकाने नियमाप्रमाणे सीट बेल्ट लावला नव्हता. शिवाय एक पोलीस कर्मचारी मोटारसायकलवर जातना मोबाइलवर बोलत असल्याचे छायाचित्र ‘लोकमत’मध्ये दि. २९ जानेवारी रोजीच्या अंकांत रिॲलिटी चेक या बातमीतून प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन पोलीस उपायुक्त दीपाली धाटे यांनी शुक्रवारी दोन्ही अधिकाऱ्यांच्या गाडीवर असलेल्या चालकाला दोनशे रुपयेप्रमाणे सीट बेल्ट न लावल्याची दंडात्मक कारवाई केली.
छायाचित्रामधील मोटारसायकलवरून जात असताना मोबाइलवर बोलणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध सुरू आहे. तपास करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त यांनी केलेल्या कारवाईमुळे पोलीस खात्यामध्ये खळबळ उडाली आहे.
आम्हाला फोटो पाठवा कारवाई करू : दीपाली धाटे
कायदा हा सर्वांसाठी समान आहे. पोलीस कर्मचारी असो किंवा अधिकारी ते दुसऱ्याला कायदा सांगत असतात. रस्ता नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करत असतात. मात्र ते स्वतः जर नियमाचे पालन करत नसतील तर नागरिकांनी अशा पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे फोटो काढावेत व ते आम्हाला ९४२३८८०००४ या मोबाइल नंबरवरील व्हाॅट्सॲपवर पाठवावेत. संबंधित नियम मोडणार्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त दीपाली धाटे यांनी केले आहे.