साेलापूर - काेराेना लसीचे दाेन डाेस पूर्ण झाले असतील, तरच नागरिकांना शुक्रवारपासून रस्त्यावर फिरणे साेयीचे हाेईल. शिवाय रेशनचे धान्य, भाजी, पेट्राेल, मद्य, सरकारी कार्यालये, दुकानांमध्ये प्रवेश मिळेल. सेतू कार्यालयात दाखला काढायचा असेल तरीही दाेन डाेस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक आहे. महापालिका, पाेलीस आणि डाॅक्टरांची पथके शुक्रवारपासून पेट्राेल पंपांपासून सर्व आस्थापनांची तपासणी करणार आहेत.
शासनाने काेराेना लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना सेवा-सुविधांचा लाभ मिळेल, असे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी सकाळी महसूल, महापालिका, पाेलीस, आराेग्य विभागाची संयुक्त बैठक घेतली. यावेळी पाेलीस उपायुक्त वैशाली कडुकर, मनपा उपायुक्त धनराज पांडे, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते. काेराेनाच्या ओमायक्राॅन या नव्या व्हेरिएंटचे संकट जिल्ह्यावर आहे. जिल्ह्यातील लसीकरणाबद्दल जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नाराजी व्यक्त केली. काेणत्याही परिस्थितीत लसीकरण पूर्ण झाले पाहिजे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. सर्व आस्थापनांमध्ये लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये, असे सांगितले.
--
लस न घेणाऱ्याला ५०० रुपये, माॅल मालकाला बसेल ५० हजार रुपये दंड
मनपा उपायुक्त धनराज पांडे म्हणाले, नागरिकांनी काेराेनाचे दाेन डाेस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र साेबत बाळगणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र ऑनलाईन डाऊनलाेड करणे शक्य आहे. माेबाईलमध्ये सेव्ह करून ठेवता येते. पेट्राेल पंप, सरकारी कार्यालये, दुकानदारांनी प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय काेणतीही सेवा देऊ नये. माॅलमध्ये लसीकरण न झालेल्या व्यक्ती आढळल्या, तर माॅलप्रमुखांना ५० हजार रुपयांचा दंड करण्यात येईल. दुकानात लसीकरण न झालेली व्यक्ती आढळली, तर दहा हजार रुपयांचा दंड करण्यात येईल. लस न घेतलेल्या व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारण्यात येईल.
--
हे पथक करेल कारवाई
सावर्जनिक अथवा खासगी वाहनांमध्ये फिरणाऱ्या नागरिकांकडे दाेन डाेस पूर्ण झालेले प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मंडई, वाईन शाॅप, बारचालक, देशी दारूची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय सेवा देऊ नये. महापालिकेचे आठ विभागीय अधिकारी, आराेग्य निरीक्षक, पाेलीस निरीक्षक, आराेग्य केंद्रातील डाॅक्टर्स यांच्या माध्यमातून विविध भागांत पथके फिरणार आहेत. या पथकांना कारवाईचे अधिकार दिल्याचेही पांडे यांनी सांगितले.
--
काेविड लसीकरणाची माहिती
- शहरातील लसीकरणाचे उद्दिष्ट - ६ लाख ४० हजार ५०३
- पहिला डाेस पूर्ण झालेल्या व्यक्ती - ५ लाख ३० हजार ९२४
- दुसरा डाेस पूर्ण झालेल्या व्यक्ती - ३ लाख ६ हजार ५२५
-
- ग्रामीण भागातील लसीकरणाचे उद्दिष्ट - २६ लाख ८० हजार १७
- पहिला डाेस पूर्ण झालेल्या व्यक्ती - २० लाख ९ हजार ३३०
- दुसरा डाेस पूर्ण झालेल्या व्यक्ती ७ लाख ९० हजार ८७३ --
-------