कुर्डूवाडी : सांगोल्यात घडलेल्या सोने चोरी प्रकरण गुन्ह्यातील हवे असलेल्या शंकर गोंडीबा गुंजाळ, धनाजी साहेबराव गुंजाळ, दिलीप साहेबराव गुंजाळ या प्रमुख तीन संशियत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या पथकावर बारलोणी (ता माढा) येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जमावाने हल्ला केला. त्यामध्ये पथकातील तीन पोलीस जखमी झाले होते व जमावाकडून पोलीस गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.
या घटनेत सामील असणाऱ्या सर्व हल्लेखोरांनी गावातून चारचाकी व दुचाकीवरून गावाबाहेर पलायन केले आहे. यात अकरा मुख्य आरोपींबरोबरच इतर पन्नास जनांवर कुर्डूवाडी पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील सर्व फरार आरोपींना शोधण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखा, कुर्डूवाडी पोलीस ठाण्याची विविध पथके दोन दिवसांपासून रवाना झालेली आहेत. यामध्ये कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाला राहुल सर्जेराव गुंजाळ (वय २२ ), यशवंत दशरथ गुंजाळ (वय ३०),अनिल दशरथ गुंजाळ (वय ४१ ) सर्वजण रा बारलोणी हे त्यातील फरार आरोपी बारलोणी- कव्हे रस्त्यावर आढळून आले आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बारलोणीत संबधीत घटना घडल्यानंतर सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्वतः सुमारे ११० पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळाला भेट देत गावाला वेढा देऊन कोबिंग ऑपरेशनही केले होते.पण त्या दिवशी तर हल्लेखोरातला त्यांना एकही आरोपी हाती लागलेला नव्हता.घटना घडलेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलीस हवालदार प्रवीण दराडे, पोलीस नाईक सागर सुरवसे, दत्ता सोमवाड, ओम दासरे यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे कव्हे रस्त्यावर वरील तीन आरोपी बसले असल्याची कुणकुण लागली.लागलीच त्यांनी तिथे पोहचत ताब्यात घेतले आहे. त्यांना माढा न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सुमारे हल्लेखोर पन्नास आरोपींपैंकी आता तीन आरोपी सापडले असल्याने पुढील आरोपींचा सुगावा लवकरच लागेल असे पोलिसांनी सांगितले आहे.