सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपवून बाहेर पडत असतानाच त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर दोन युवक आडवे आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गाडी अडविण्याचा प्रयत्न करीत असताना पालकमंत्री न्याय द्या..., न्याय द्या... असे म्हणून ते गाडीसमोर झोपले. याचवेळी बंदोबस्तावर असलेल्या पेालिसांनी तातडीने संबंधित युवकास बाजूला करून ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
अभिजित गोरख नेटके (रा. तांबोळी, ता. मोहोळ) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिजीत नेटके यानी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तांबोळी येथे रामचंद्र नेटके यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून अवैधरित्या घरांचे बांधकाम चालू केले आहे. घरकुलाचे बांधकाम सार्वजनिक रस्त्यावर केल्यास वाहतूकीस अडथळा होणार आहे. याबाबत ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी यांना तक्रारी अर्ज देऊन सुध्दा संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केल्याचे अभिजित नेटके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पोलिसांची धावपळ अन्
पालकमंत्री यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न करणार्या युवकांच्या घटनेमुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची काहीकाळ धावपळ झाली. या घटनेमुळे पालकमंत्र्यांचा वाहनांचा ताफा काही वेळ थांबला होता. यामुळे नियोजन भवनासमोर गोंधळ निर्माण झाला.