सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांची सोलापूर अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.
बार्शीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वाद आता नव्याने सांगण्याची गरज नाही. शिवाय व्यापारी आणि पोलीस यांच्यातदेखील अनेक मुद्द्यावर मतभेद निर्माण झाले होते. आमदार राऊत यांनी देखील शेळके यांच्यावर अवैध धंद्यांना ते सहकार्य करत असल्याचा आरोप करून विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. राऊत यांनी फटे प्रकरणात ही आरोप केले होते. विविध सामाजिक संघटनांनी ही शेळके यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. राज्यात सत्ता परिवर्तन होताच रामदास शेळके यांची बदली होणार अशी चर्चा समाज माध्यम आणि नागरिकांत सुरू होती. दोनच दिवसांपूर्वी आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यात ही बैठक झाली असल्याची माहिती आहे. शेळके यांना सोलापूरला बोलावून घेऊन मुख्यालयात बदली करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. सत्ता बदलताच शेळके यांची लगेच बदली झाल्याची चर्चा सुरू आहे.