सोलापूर : जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवार, १३ एप्रिलपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. एकूण ४८ सदस्यांसाठी निवडणूक होणार असून रविवार, ५ जून रोजी मतदान नियोजित आहे.
शुक्रवारी, १३ मेपासून उमेदवारी अर्जविक्री व स्वीकृती कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे. एकूण ११ तालुक्यांतील ४२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून सर्वाधिक अक्कलकोट तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नियोजित आहे. १४ ग्रामपंचायतींमधील १४ सदस्यांसाठी निवडणूक नियोजित आहे.
करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या दोन सदस्यांसाठी, माढामधील दोन ग्रामपंचायतींच्या २ जागांसाठी, बार्शीमधील ५ ग्रामपंचायतींच्या ५ जागांसाठी, उत्तर सोलापूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतच्या १ जागेसाठी, मोहोळमधील २ ग्रामपंचायतींच्या ३ जागांसाठी, पंढरपूरमधील २ ग्रामपंचायतींच्या दोन जागांसाठी, माळशिरसच्या ५ ग्रामपंचायतींच्या ७ जागांसाठी, सांगोल्यातील १ ग्रामपंचायतीच्या १ जागेसाठी, मंगळवेढामधील ३ ग्रामपंचायतींच्या ३ जागांसाठी, दक्षिण सोलापूरमधील ५ ग्रामपंचायतींच्या ८ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
असा आहे कार्यक्रम
- १३ ते २० मे : अर्जविक्री व स्वीकृती
- २३ मे, दुपारी ३ पर्यंत : प्राप्त अर्जांची छाननी
- २५ मे : अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस
- २५ मे : दुपारी ३ पर्यंत : उमेदवारांची अंतिम यादी चिन्हासह प्रसिद्धी
- ५ जून : मतदान
- ५ जून : मतमोजणी