सोलापूर : भवानी पेठेतील अक्कामहादेवी मंदिर जवळ आयोजित करण्यात आलेल्या घोंगडी बैठकीमध्ये लोकांची गर्दी करून कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह २५ जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर, आयोजक नगरसेवक संजय कणके, प्रकाश कारंडे, संजय पुजारी, राजू बंडगर, संतोष कारंडे, प्रकाश आनंदकर, रवि हाके, सचिन पाटील, समर्थ माशाळकर, अजय रुपणार, शरणू हांडे, परदेशी, बिपीन पाटील व अन्य १० ते १५ कार्यकर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भवानी पेठेतील अक्कामहादेवी मंदिर जवळ सायंकाळी ६.३० घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत लोकांची गर्दी झाली होती. फिजिकल डिस्टंसिंग न ठेवता लोकांच्या जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करण्यात आले होते. कोरोना नियमाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पोलीस शिपाई आसिफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८, ३३६, २६९ आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार पाटील करीत आहेत.