सोलापूर : परीक्षेवेळी अत्याचार केल्याची तक्रार दिली म्हणून बारावीच्या मुलीची बोटं छाटली. याशिवाय अल्पवयीन मुलीच्या कपाळावर अन् डोक्यावर सत्तूरने वारही केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पीडित अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणात कर्तव्यात कसूर व गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न केल्याप्रकरणी बार्शीच्या शहर पोलिस ठाण्यातील एका सहायक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस उपनिरीक्षक, एक हेडकॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक महारूद्र परजणे, बार्शी तालुक्यातील पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र मंगरूळे, डब्ल्यूपीएसआय सारिका बजरंग गुटकुल, बार्शी शहरचे हेडकॉन्स्टेबल भगवान माळी अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर करणारे, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी ६ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास घडली होती. पीडित मुलगी अल्पवयीन असून, तिच्यावर ५ मार्च रोजी दोघांनी अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीने त्यांच्याविरोधात ५ मार्च रोजी बार्शी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपींना अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. शिवाय या प्रकरणात तपास करताना कर्तव्यात कसूर केली. याप्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.