आप्पासाहेब पाटील
सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना इंटरसेप्टर वाहन तसेच डिव्हाईसच्या माध्यमातून ऑनलाइन चलन (दंड) ठोठावला आहे. वारंवार सांगून.. एसएमएसद्वारे अलर्ट करून.. नोटिसा बजावूनही अनपेड रकमेचा भरणा न केलेल्या १४ हजार ९१२ वाहनधारकांविरोधात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांचे आदेश प्राप्त होताच संबंधित न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील जिल्हा वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी लोकमतशी बोलताना दिली.
-----------
मोठा भुर्दंड सोसावा लागणार
आता वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनचालकांना आता मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. राज्य सरकारने मोटार वाहन अधिनियम २०१९ ची अंमलबजावणी करण्याबाबत अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेची अधिनियमानुसार ई-चलन प्रणालीमध्ये नवीन दंडाची रक्कम ११ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून अद्ययावत करण्यात आली आहे.
-----------
अशी आहे मोहिमेसंदर्भात माहिती...
- - १६ हजार २०१
- अनपेड चलन न भरलेल्या लोकांना पाठविल्या नोटिसा
- - १ कोटी ७६ लाख ४५ हजार १५० रुपये
- एकूण अनपेड चलनाची थकीत रक्कम
- १२८८ वाहनधारक
- लोकअदालतीत हजर राहून ५ लाख ५७ हजार ९०० रुपये दंडाची रक्कम भरली - १४ हजार ९०२
- वाहनधारकांनी अनपेड चलन भरलेच नाही. आता त्याच्यावर खटला दाखल होण्याचे संकेत आहेत.
------------
मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात नवीन दंड आकारणी जाहीर केली त्यानुसार दंडाची रक्कम वसूल करण्यात येत आहे, तसेच काही प्रकरणात न्यायालयात खटलेदेखील दाखल करण्यात येणार आहेत. भुर्दंड टाळायचा असेल तर वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे.
- मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण.