सोलापूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेताच सिद्धेश्वर साखर कारखान्याचे विस्तारीकरण झाले. याबाबत केंद्रीय चौकशी कमिटीनेही आश्चर्य व्यक्त केले. सिद्धेश्वर साखर कारखान्याची गुरुवारी प्राथमिक तपासणी झाली. तब्बल साडेतीन तास कारखान्याची तपासणी झाली. तपासणीदरम्यान कमिटीच्या सदस्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पुन्हा लवकरच कारखान्याची दुसऱ्यांदा तपासणी होणार आहे. तपासणीच्या प्राथमिक अंदाजानुसार कारखान्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतलेली नाही. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या विस्तारीकरण दरम्यान कारखान्याने केंद्रीय पर्यावरण विभागाची अनुमती घेतली आहे का?, घेतली नसेल तर मग विस्तारीकरण झाले आहे का?, या गोष्टींची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कमिटीकडून गुरुवारी दुपारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची तपासणी झाली. तपासणीचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाच्या कोर्टात समोर सादर होणार आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाची परवानगी न घेता सिद्धेश्वर साखर कारखान्याचे विस्तारीकरण झाले आहे, अशी तक्रार संजय थोबडे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केली होती. थोबडे यांच्या तक्रारीनंतर हरित लवादाने सिद्धेश्वर साखर कारखान्याची तपासणी करण्याकरिता केंद्रीय कमिटीची स्थापना केली. या कमिटीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य, तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा समावेश आहे. पंधरा दिवसांपूर्वी या कमिटीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीनंतर गुरुवारी कमिटीने कारखान्याची पाहणी केली. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान केंद्रीय कमिटीचे सदस्य सिद्धेश्वर साखर कारखान्यात दाखल झाले. यावेळी कारखान्याच्या प्रतिनिधींनी कमिटीचे स्वागत केले. कमिटीने विचारलेल्या प्रश्नांना कारखाना प्रतिनिधींनी उत्तरे दिली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निचळ, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, आदींनी कारखान्याची पाहणी केली.
ही झाली पाहणी
सुरुवातीला सदस्यांनी साखर निर्मिती प्रक्रिया पाहिली. तांत्रिक मुद्द्यांची तपासणी केली. त्यानंतर कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र, डिस्टिलरी प्लांट, को-जनरेशन प्रकल्प यासह कारखान्यातील व्यवस्थापनाचीही माहिती घेतली. कारखान्यामुळे पर्यावरणाला हानिकारक गोष्टींचीही तपासणी झाली.