सोलापूर - पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. मुंबईतून विमानाने बुधवारी सकाळी ९ वाजता त्यांचे सोलापुरात आगमन होणार आहे.
परवाच्या सोलापूर दौऱ्यात ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी विशेष घोषणा केली नव्हती, मात्र थोडा संयम ठेवा. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल, असा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दोन जिल्ह्यातील नेत्यांना पाठविला आहे.
पावसामुळे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नका सोडू धीर, सरकार आहे खंबीर असा निरोप द्यायला आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. पुरात ज्या कुटूंबायांची जिवीत हानी झाला त्यांना मदतीचा धनादेश दिला. मात्र विशेष घोषणा केली नाही. आता बुधवारी ते उस्मानाबाद जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात ते विशेष घोषणा करतात का? याकडे लक्ष असेल.
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिकांना पुन्हा अलर्ट केले आहे. थोडा संयम, शासनावर विश्वास, प्रश्न सुटतील हमखास असा निरोपही त्यांनी शिवसैनिकांमार्फत शेतकऱ्यांना दिला आहे.
असा असेल दौरासकाळी ९ वाजता सोलापुरात आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे शासकीय विश्रामगृहात थांबणार आहेत. त्यानंतर ते तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे पाहणी करतील. त्यानंतर आपसिंगा, दुपारी ११.१५ वाजता तुळजापूर, दुपारी १२.२० वाजता पूरस्थितीबाबत शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. दुपारी २.४५ वाजता ते पुन्हा सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर येतील. दुपारी साडेतीन वाजता सोलापूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण करतील.