सोलापूर : शहर परिससरातीली जिल्हा परिषदेच्या ३६ शाळा महापालिककडे वर्ग करण्याचा निर्णय आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाला. जिल्हा परिषदेने महापालिकेला जागेची मालकी न देता, एनओसी द्यावी व त्यावर शाळांची दुरूस्ती करून जागा वापरावी, असेे पालकमंत्री दत्रात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. त्यावर आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘एनओसी’वर दुरूस्तीला खर्च क़रता येत नसल्याची अडचण सांगितली. ही अडचण जिल्हाधिकारी दूर करतील, अशी ग्वाही भरणे यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक़ शनिवारी झाली. या बैठकीत आनंद चंदनशिवे यांनी शहराच्या हद्दीत जिल्हा परिषदेच्या ३६ शाळा आहेत. झोपडपट्टीतील अनेक मुले याठिकाणी उघड्यावर शिक्षण घेत आहेत. या शाळांच्या इमारती महापालिकेला हस्तांतरित केल्यास प्रश्न सुटणार आहे. तीन वर्षे चार पालकमंत्र्यांसमोर मी हा विषय मांडतोय, असे सांगितले. यावर पालकमंत्री भरणे यांनी पाच वर्षे सोलापूरचे पालकमंत्री तुमच्या पक्षाकडे होते तरी प्रश्न सुटला नाही, सांगा बापू या शाळांचे काय करायचे? असा मिश्कील प्रश्न आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाहात उपस्थित केला. देशमुख यांनी जिल्हा परिषद जागांचा मोबदला मागत असल्याचे निदर्शनाला आणले. महापालिकेची इतकी आर्थिक क्षमता नसल्याने आम्ही हा प्रश्न मुख्यमंत्र्यापर्यंत नेला होता, असे स्पष्ट केले. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक यांनी शाळेची जागा भाडेकराराने द्या, असे सुचविले.
उमेश पाटील यांनी मोक्याच्या जागा महापालिकेला कशा देता येतील, असा प्रश्न केला. यावरून चंदनशिवे व त्यांच्यात वाद सुरू झाला. यात हस्तक्षेप करत पालकमंत्री भरणे यांनी हा प्रश्न सामंजस्याने सोडवू, असे सांगितले. आमदार संजयमामा शिंदे यांनी नुसत्या इमारती नव्हे तर शिक्षकांसह महापालिकेने जबाबदारी घ्यावी, अशी सूचना मांडली. वसंतनाना देशमुख यांनी आम्हाला आरोग्य केंद्रासाठी जागा खरेदी करावी लागते. त्याप्रमाणे महापालिकेनेही मोफत जागेचा आग्रह सोडावा. यासाठी शासनाकडून निधी मागावा, असे सूचविले.
महामार्गावरील शाळा सुरू करा
सुभाष माने, भारत शिंदे, अरूण तोडकर यांनी महामार्गावरील पाडण्यात आलेल्या शाळा कधी बांधणार, असा प्रश्न विचारला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी १७ शाळा बाधित असून, सोमवारी यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
दवाखान्यांचे फायर ऑडिट करा
भंडाऱ्यातील दुर्घटनेची दखल घेत महापालिकेच्या दवाखान्यांचे फायर ऑडिट करावे, अशी सूचना फिरदोस पटेल यांनी केली. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधल्याबद्दल पालकमंत्री भरणे यांनी त्यांचे कौतुक करत निधीची तरतूद केली जाईल, असे सांगितले. आमदार शहाजीबापू पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बंधारे गळतीचा प्रश्न मार्गी लावावा, असे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना भरणे यांनी थेट संपर्क करून यावर बैठक घेण्याचे ठरवले.