सोलापूर : दर १० दिवसांनी दूध उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागल्याने दूध संकलन प्रतिदिन ६५ हजार लिटर होत आहे. ते एक लाख लिटरवर जाण्यासाठी नियोजन असल्याचे सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष दिलीप माने यांनी सांगितले.
दूध दर खरेदीत सतत बदल होत असल्याने जिल्हा संघाच्या संकलनावर कमालीचा परिणाम झाला होता. आर्थिक स्थिती कोलमडल्याने दूध उत्पादकांच्या तीन-चार पगारी थकल्या होत्या. दूध संघ (दूधपंढरी)चे संकलन ३५ हजार लिटरवर आले होते. संघ सावरतो की नाही?, असे चित्र असताना माजी आमदार दिलीप माने यांची सप्टेंबर महिन्यात चेअरमन म्हणून निवड झाली. त्यानंतर तीन महिन्यांनंतर दर १० दिवसाला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. त्यामुळे सध्या दररोज दूध संकलन ६५ हजार लिटर इतके होत असल्याचे अध्यक्ष माने यांनी सांगितले.
उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रति लिटरला २५ रुपये ५० पैसे व म्हशीच्या दुधाला ३९ रुपये इतका दर दिला जात असल्यानेही संकलन वाढत असल्याचे सांगण्यात आले. एक लाख लिटरवर संकलन जाण्यासाठी प्रयत्न असल्याचे माने म्हणाले. खर्च कमी करण्यासाठी चिलिंग केंद्रात उच्च दाबाऐवजी साध्या दराची वीज वापर सुरू केल्याने महिन्याला पाच ते सहा लाख रुपयांची बचत होत आहे. शहरात पॅकिंग दूध विक्री तीन हजार लिटरने वाढली असून, वर्षभरात ७५ कर्मचारी कमी झाल्याने वेतनावरील खर्च दर महिन्याला सात लाखाने कमी झाला.
गाय, म्हैस खरेदीसाठी अनुदान
किसान क्रेडिट कार्ड भरून शासनाच्या पोर्टलवर भरून दिले तर केंद्र सरकार गाय, म्हैस खरेदीसाठी अनुदान देणार आहे. आतापर्यंत साडेपाच हजार शेतकऱ्यांचे फार्म भरले असून, १० हजार फार्म भरण्यात येतील असे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी सांगितले. ३०० ते ५०० लिटर दूध संकलन असलेल्या बल्क कुलरला मशीनसाठी ७५ टक्के, तर त्यापेक्षा अधिक संकलन असलेल्या बल्क कुलरसाठी ५० टक्के अनुदान राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास योजनेतून मिळणार आहे. यासाठी दूध संघ किंवा राष्ट्रीय बँकाकडे फार्म भरून देण्यात यावेत, असे मुळे यांनी सांगितले.