Madha Lok Sabha ( Marathi News ) : गेल्या अनेक दिवसांपासून अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबाबाबत राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती त्या चर्चेवर शिक्कामोर्तब होणार, हे आता अखेर निश्चित झालं आहे. मोहित पाटील कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी आज सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली असून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाविषयी या भेटीत चर्चा करण्यात आली. अकलूजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे १३ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होईल आणि या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित राहतील, अशी माहिती शरद पवारांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मोहिते पाटील कुटुंबीय घरवापसी करणार असल्याने भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का मानला जात आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर करत सातारा आणि रावेर मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला दहा जागा आल्या असून पहिल्या दोन याद्यांमध्ये सात आणि आज दोन उमेदवार जाहीर करत पवारांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत एकूण ९ उमेदवारांची घोषणा केली आहे. आता पक्षाकडून केवळ माढा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा होणं बाकी आहे. या घोषणेलाही आता अखेर मुहूर्त मिळाला असून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळीच त्यांच्या उमेदवारीचीही घोषणा होणार असल्याचे समजते. तसंच १६ एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थितीतच ते माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांचा १३ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. याच औचित्यावर ते आपल्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करणार असून कुटुंबातील ज्येष्ठांचाही त्यांना आशीर्वाद मिळणार आहे. मात्र या पक्षप्रवेश सोहळ्याला धैर्यशील यांचे बंधू आणि भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित राहणार की नाही, याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता आहे.
मोहिते पाटलांनी का केलं बंड?
माढ्यात भाजपने पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी गावभेटी, मेळावे सुरू केले आहेत. पण त्यांना महायुतीमधील आणि राजकारणातील मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर या दोन मातब्बर घराण्याचा विरोध आहे. यासाठी दोन्ही घराण्यातील प्रमुखांच्या अनेक भेटीही झाल्या आहेत. त्यातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाऊन उमेदवारी घेण्याचा पर्याय पुढे आला आहे.
अनिकेत देशमुखही होते तयारीत
सांगोला तालुक्यातील माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हेही माढ्यातून लढण्याच्या तयारीत होते. यासाठी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मात्र आता मोहिते पाटील कुटुंबाच्या घरवापसीने देशमुख यांची उमेदवारी मागे पडणार आहे.