कुरुल : टाकळी सिंकदर येथील भीमा कारखाना निवडणुकीत तिसऱ्यांदा महाडिक गटाची सत्ता आली आहे. चेअरमन तथा खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडीतील सर्व १५ उमेदवार विजयी झाले आहेत. सरासरी साडेसहा हजार मताधिक्क्याने विजय मिळवत बचाव पॅनलचा धुव्वा उडवत महाडिकांनी मैदान मारलं आणि ‘पाटलांची पोरं’ चित झाली.
भीमा साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने मोहोळ पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यांतील वातावरण ढवळून निघाले होते. सोमवारी सोलापुरातील सिद्धेश्वर कारखान्यासाठी काडादी मंगल कार्यालयात मतमोजणीच्या एकूण दोन फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीतील मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. या फेरीत आंबेचिंचोली, पुळूज, पुळुजवाडी, फुलचिंचोली, शंकरगाव, विटे, उचेठाण, ब्रह्मपुरी, औंढी, टाकळी सिकंदर, पेनुर, पाटकुल, वरकुटे, तांबोळे, सौंदणे, मगरवाडी, तारापूर या गावांतील बूथवरील मतदान २८ टेबलांवर मोजण्याचे काम सुरू झाले. सुरुवातीला वेगवेगळ्या रंगाच्या चिठ्ठ्या एकत्रित करण्याचे काम सुरू झाले. पहिल्या फेरीअखेर भीमा शेतकरी विकास आघाडीला ५,७४१ तर भीमा बचाव परिवर्तन पॅनलला २,१६४ मते मिळाली आहेत. महाडिक गट पहिल्या फेरीत भीमा बचाव पॅनलपेक्षा ३,५७७ मतांनी आघाडीवर होता. दरम्यान, संस्था प्रतिनिधी मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी ४३पैकी ३१ मते घेत १९ मतांच्या फरकाने विजय मिळवला. विरोधी बचाव पॅनलचे राजेंद्र माने यांना ११ मते मिळाली.
दुसऱ्या फेरीत तुंगत, सुस्ते, अंकोली, अर्धनारी, इंचगाव, वडदेगाव, वाघोली, घोडेश्वर, शेजबाभूळगाव, येणकी, विरवडे बु., कोथाळे, कातेवाडी, कुरुल, सोहाळे, वडवळ, ढोकबाभूळगाव, पोखरापूर, गोटेवाडी, नजीक पिंपरी, पापरी, येवती, कोन्हेरी, खंडाळी, भीमा कारखाना कॉलनी (संस्था गट) अशी एकूण २८ टेबलांवर मतमोजणी झाली. दुसऱ्या फेरीअखेरही महाडिक गटातील सर्व उमेदवार सुमारे साडेसहा हजार मताधिक्क्याने विजयी झाले. पहिल्या फेरीचा निकाल हाती येताच खा. धनंजय महाडिक मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा कार्यकर्त्यांची गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष केला.
.............
खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात विजयी झालेल्या उमेदवारांची गटनिहाय नावे व पडलेली मते पुढीलप्रमाणे आहेत.
संस्था गट
- धनंजय महाडिक : ३१
*पुळूज ऊस उत्पादक गट
- विश्वराज महाडिक - १०६२९
- बिभीषण वाघ - १०२३७
* टाकळी सिकंदर गट
- संभाजी कोकाटे - १०५८८
- सुनील चव्हाण - १०५६३
* सुस्ते गट
- तात्या नागटिळक - १०७६४
- संतोष सावंत - १०१३८
* अंकोली गट
- सतीश जगताप - १०१९०
- गणपत पुदे - १००३१
* कोन्हेरी गट
- राजेंद्र टेकळे - १०५७१
* अनुसूचित जाती-जमाती गट
- बाळासाहेब गवळी १०७४६
- * महिला राखीव गट
- सिंधू जाधव - १०७७८
- प्रतीक्षा शिंदे - १०२९२
* इतर मागास प्रवर्ग गट
- अनिल गवळी १०८६४
* भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्ग
- सिद्राम मदने - १०७७८
...........
विरोधी भीमा बचाव परिवर्तन पॅनलचे उमेदवार व पडलेली मते
- देवानंद गुंड - ४१०३
- कल्याणराव पाटील - ४१७२
- शिवाजी भोसले - ४१७०
- राजाराम माने - ३९७८
- पंकज नायकोडे - ४२५१
- विठ्ठल रणदिवे - ३९८४
- भारत पवार - ३९९५
- रघुनाथ सुरवसे - ३८६५
- कुमार गोडसे - ४३७४
- भारत सुतकर - ४२१७
- अर्चना घाडगे -४१४१
- सुहासिनी चव्हाण - ४०२२
- राजाभाऊ भंडारे - ४१५९
- राजू गावडे - ४१४९
- राजेंद्र माने : ११