सोलापूर : उजनी धरण व वीर पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून ६० हजार क्युसेकचा तर वीरधरणातून १६ हजार ९११ क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. तर नाझरे धरणातून कऱ्हा नदीत १५ हजार क्युसेकचा पाणी सोडण्यात येत आहे. कऱ्हा नदीचे पाणी निरा नदीत मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केली आहे.
मागील काही दिवसापासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. भीमा नदी पात्रात सध्या ३० हजार ७५९ क्युसेक पाणी वहात आहे. त्यामुळे दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे ६ बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
भीमा नदीपात्रात १ लाख १५ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर नदीकाठी असणार्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. १ लाख ३८ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर १ लाख ७० हजार क्युसेक विसर्ग आल्यावर संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते. तर १ लाख ९७ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोविंदपुरा येथे पाणी येते वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी आवश्यकती दक्षता घेऊन सतर्कता बाळगावी. असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केली आहे.
भीमा नदीवरील पंढरपूर तालूक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली जात असल्याने या बंधार्यावरुन होणारी वाहतूक बंद राहणार आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात उतरु नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलअधिकारी, पोलीस पाटील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे