सोलापूर : मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आसूड आंदोलन करून परत निघालेल्या कार्यकर्त्यांनी, पार्क चौकातील एटीएम सेंटर व जगदंबा चौकातील एका कपड्याच्या दुकानांवर दगडफेक करून संताप व्यक्त केला.
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील विविध विविध भागातून लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्या घरावर आसूड मोर्चा काढला होता. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अश्?वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी 'एक मराठा लाख मराठा'... अशा घोषणा देत प्रथमता निदर्शने केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीमध्ये निदर्शने करण्यात आली. निदर्शने झाल्यानंतर मराठा समाजाचा मोर्चा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती मंदीर येथील घरावर काढण्यात आला.
माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर घोषणाबाजी करत मराठा आंदोलन कार्यकर्त्यानी निवेदन दिले. तेथे आपले आंदोलन संपून कार्यकर्ते सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास परतीच्या मार्गावर जात असताना पार्क चौकातील सुरु असलेल्या ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेवर अचानक दगडफेक केली. दगडफेकीत बँकेचे व एटीएम सेंटर चेक काच फुटून नुकसान झाले. हा प्रकार लक्षात येताच तात्काळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे व त्यांचे पथक घटनास्थळी हजर झाले. त्यावेळी चौकामध्ये थोडी पळापळ झाली. बँकेचे शटर बंद करून घेण्यात आले.
दुसºया ठिकाणी अकरा वाजण्याच्या सुमारास सात वाजता येथून लोकप्रतिनिधी आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरावरही मराठा मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलनकर्त्यानी जनवात्सल्य या निवासस्थानी जाऊन घोषणाबाजी केली तिथेही निवेदन देण्यात आले. आंदोलन संपल्यानंतर कार्यकर्ते परतीच्या मार्गावर निघाले असता जगदंबा चौकातील ममता या कापड दुकानांवर दगडफेक केली, यामध्ये दुकानाचे काच फुटून किरकोळ नुकसान झाले. दगडफेक झाल्यानंतर चौकामध्ये पळापळ झाली तेव्हा तात्काळ पोलीस घटनास्थळी धावून आले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यांमध्ये झाली आहे.