सोलापूर : नव्याने स्थापन झालेल्या श्रीपूर] माळुंग, वैराग तसेच नातेपुते या नगरपंचायती तसेच मुदत संपलेल्या माढा व माळशिरस अशा एकूण पाच नगरपंचायतींसाठी निवडणूक विभागाने निवडणूक कार्यक्रम बुधवारी सायंकाळी जाहीर केला असून, यासाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. बुधवार, एक डिसेंबरपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होणार असून, २२ डिसेेंबरला मतमोजणी नियोजित आहे.
या पाच नगरपंचायतींसाठी मंगळवारी, २३ नोव्हेंबर रोजी प्रभाग रचना जाहीर झाली होती. प्रत्येक नगरपंचायतींची सदस्य संख्या १७ असून, या नियाेजित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार आहेत. साेमवारी, २९ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध हाेईल.
श्रीपूर, वैराग व नातेपुते या नगरपंचायती नव्याने स्थापन झाल्या आहेत. त्यासोबत माढा आणि माळशिरसच्या नगरपंचायतींची मुदत संपल्याने तेथे प्रशासक आहे. प्रत्येक नगरपंचायतीत अनुसूचित जातींसाठी ४ जागा, ओबीसीसाठी ४ जागा तसेच महिलांसाठी ९ जागा असे एकूण १७ सदस्यांची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. महिलांच्या ९ राखीव जागांमध्ये अनुसूचित जातीसाठी २ जागा, ओबीसीसाठी २ आणि सर्वसाधारण विभागात ५ जागांचा समावेश आहे.
असा आहे कार्यक्रम
- अंतिम मतदार यादी प्रसिद्धी दिनांक : २९ नोव्हेंबर
- निवडणूक कार्यक्रम जाहीर : ३० नोव्हेंबर
- उमेदवारी अर्ज वितरण व सादर : १ ते ७ डिसेंबर, सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत
- छाननी : बुधवारी ८ डिसेंबर, सकाळी ११ वाजल्यापासून
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख : १३ डिसेंबर, दुपारी ३ वाजेपर्यंत
- हरकती घेण्याचा दिनांक : १३ डिसेंबर दुपारी ३ पर्यंत
- चिन्ह वाटप : १३ डिसेंबर, दुपारी ३ नंतर
- मतदान दिनांक : २१ डिसेंबर, स. ७.३० ते सायं. ५.३० पर्यंत
- मतमोजणी : २२ डिसेंबर, सकाळी १० वाजल्यापासून.