मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे
क्रेडीट कार्डावर वार्षिक विमा असून, त्या क्रेडीट कार्डाचे लिमिट वाढवायचे आहे, असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने ओटीपी नंबर घेऊन मंगळवेढा आगारातील एस.टी. बस कंडक्टर शशिकांत लक्ष्मण महामुनी ( रा. भोसे) यांची १ लाख ४३ हजार ७८१ रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.
याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात ऑनलाइन फसवणुकीचे मंगळवेढ्यात दोन गुन्हे घडल्याने बँक ग्राहकांमधून मोठी खळबळ उडाली आहे.
यातील फिर्यादी शशिकांत महामुनी हे मंगळवेढा आगारात बस कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ७५८७९१७४५३ या क्रमांकाच्या मोबाईलवरून एक कॉल आला. मी अग्निहोत्री, मुंबई येथील आयसीआयसीआयी बँकेतून बोलत असल्याचे समोरच्या वक्तीकडून सांगण्यात आले. तुमच्या क्रेडीट कार्डावर २४९९ रुपयांचा वार्षिक विमा आहे. तुमच्या क्रेडीट कार्डची लिमिट वाढवायची आहे, असे फिर्यादीस सांगण्यात आले.
त्यानंतर फिर्यादीने त्या वक्तीवर विश्वास ठेवला आणि मोबाईलमध्ये आहेत. आलेल्या ओटीपीची माहिती संबंधित व्यक्तीकडून घेण्यात आली. फोन करणाऱ्या व्यक्तीला ओटीपीची माहिती दिली. त्यानंतर क्रेडीट कार्डावरून पाच वेळा ट्रान्जेक्शन झाल्याचे मेसेज आले.
दरम्यान, पहिल्या ट्रान्जेक्शनला २३ हजार २३० रुपये, दुसऱ्या ट्रान्जेक्शनला २०हजार ६०३ रुपये, तिसऱ्या ट्रान्जेक्शनला २० हजार रुपये, चौथ्याला २५ हजार रुपये, पाचव्या ट्रान्जेक्शनला ५४९४८ रुपये असे एकूण १ लाख ४३ हजार ७८१ रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. या घटनेचा तपास पो. नि. रणजित माने करीत आहेत.फसवणूक टाळा.....
वीज बिल भरणे अथवा क्रेडिट कार्ड संबधी शेकडो व्यक्तींना विविध नंबर वरून फसवे मेसेज येत आहेत. कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाचे खाते, क्रेडीट, डेबीट कार्ड माहिती , डिजिटल कार्ड नंबर, वैधता, सीव्हीवी नंबर विचारत नाही. तो नंबर कोणालाही देऊ नका, आपल्या मोबाइलवर आलेला वन टाइम पासवर्ड (ओटीपी) कोणासही देऊ नका, एटीएमचा पीन क्रमांक कुठेही लिहून ठेवू नका तरी फसवणूक टाळण्यासाठी अशा फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांनी केले आहे