मंगळवेढा : खाकी ला मलीन करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या पहिल्या भेटीप्रसंगी दिला होता, तरीही याकडे दुर्लक्ष करणे दोन पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच भोवले आहे.
मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई संदिप सावंत व पैगंबर नदाफ या दोघांनी नियमबाह्य कामे केल्याची गोपनीय तक्रार पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना प्राप्त होताच त्यांनी तात्काळ त्या दोघांची उचलबांगडी पोलिस मुख्यालयात केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान,या दोघांच्या चौकशीसाठी करमाळा विभागाचे डी.वाय.एस.पी.विशाल हिरे यांच्याकडे देण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पोलिस शिपाई संदिप सावंत, पैगंबर नदाफ हे दोघे मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असून त्यांना येथील अधिकार्यांनी विशेष पथक म्हणून दोन महिन्यापासून नेमले आहे. यांच्याकडे अवैध वाळू उपसा, जुगार, मटका, अवैध दारू धंदे यावर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कारवाई करण्यापेक्षा त्यांचा अन्य गोष्टीकडे जास्त कल असल्याच्या तक्रारी होत्या. यापुर्वी जुगारातील मुद्देमाल हडप केल्याची तक्रार डी.वाय.एस.पी. यांच्याकडे केली होती. मात्र या चौकशीत त्यांना क्लिन चिट मिळाली होती. तक्रार येवूनही पुन्हा त्यांना अधिकार्यांनी पथकात ठेवल्यामुळे नागरिकातून तक्रारीचा सूर वाढत गेला. या अचानक झालेल्या दोघांच्या उचल बांगडीमुळे पोलिस दलात उलट सुलट चर्चा सुरु आहे.