सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूरच्या पथकाने गुरुवारी बक्षीहिप्परगा (ता. दक्षिण सोलापूर) येथे एका अलिशान कारमधून वाहतूक होणारी आठशे लिटर हातभट्टी दारु जप्त केली. तसेच सांगोलाच्या पथकाने नाझरे (ता. सांगोला) व पंढरपूरच्या पथकाने सरपडोह (ता. करमाळा) येथील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून ३५ लिटर हातभट्टी दारु व २ हजार सहाशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायन जप्त केले आहे.
निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी बक्षीहिप्परगा ते मुळेगाव तांडा रोडवर १२ जानेवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास सापळा लावला. बक्षी हिप्परगा हद्दीत एक चारचाकी वाहन रस्त्यावरुन येताना दिसले. त्या गाडीची तपासणी केली असता दोघेजण व हातभट्टी दारुने भरलेल्या रबरी ट्युब मिळून आल्या. या प्रकरणात दिगंबर चंदु राठोड (रा. वरळेगाव तांडा) व रामचंद्र अंबादास जाधव (रा. बक्षी हिप्परगा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत ३ ालख ४० हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडिकट, गजानन ढब्बे व वाहन चालक रशीद शेख यांनी पार पाडली.
अचानक टाकलेल्या धाडीत रसायन नष्ट...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक सांगोला कैलास छत्रे यांनी सांगोला तालुक्यातील नाझरे गावातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून ४०० लिटर रसायन जप्त करुन जागीच नाश केले. नागेश लक्ष्मण जाधव याच्या ताब्यातून ३५ लिटर हातभट्टी दारु जप्त केली. पंढरपूर विभागाचे निरिक्षक पवन मुळे व दुय्यम निरिक्षक शंकर पाटील यांनी त्यांच्या पथकासह करमाळा तालुक्यातील सरपडोह गावातील हातभट्ट्यांवर धाड टाकून २ हजार २५० पन्नास लिटर रसायन जप्त केले. दोन्ही पथकांच्या कारवाईत एकूण ६५ हजार ८३० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.