सोलापूर : गुन्हा कोणताही असो... संबंधित आरोपीला पकडल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेले जाते. सुरुवातीला तो खरं बोलत नाही; मात्र जेव्हा त्याला भाग्यवान पट्टा पोलिसांच्या हातात दिसतो तेव्हा तो पोपटासारखं बोलायला सुरू करतो. नाही म्हणणारा आरोपी सत्य परिस्थितीवर येतो, खरं काय ते सांगतो. गुन्हा साधा असो किंवा किचकट तो उघडकीस आणण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अन् पोलीस चौक्यांमध्ये भाग्यवान पट्टा ठेवलेला असतो;मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून गेल्या दोन वर्षांपासून हा भाग्यवान पट्टा पोलीस ठाण्यातून गायब झाला आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, चोरी, दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, विनयभंग, अत्याचार आदी प्रकारचा कोणताही गुन्हा घडला की पोलीस संबंधित गुन्ह्यातील संशयितांना पकडतात. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सुरुवातीला तो गुन्ह्याची कबुली देत नाही. मी गुन्हा केलाच नाही यावर तो ठाम असतो. अशावेळी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना भाग्यवान पट्ट्याचा वापर करावा लागतो. प्रत्येक पोलीस ठाण्यात भाग्यवान पट्टा ठेवला जातो. पोलीस कोठडीत भाग्यवान पट्टा संशयित आरोपीच्या हातावर पडताच, एक-एक सत्य बाहेर येण्यास सुरुवात होते. गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहे, किती गुन्हे केले आहेत, गुन्हा कसा केला, कोठे केला, कोणाच्या सांगण्यावरून केला आदी एक ना अनेक गोष्टींची उकल होते. आरोपीच्या सांगण्यावरून गुन्ह्याचा तपास केला जातो, त्यानंतर सर्व बाबी विचारात घेऊन दोषारोपपत्र तयार केले जाते.
यांना भाग्यवान पट्ट्याचीच भाषा कळते
० संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला प्रथमत: प्रेमाने विचारले जाते. गुन्हा केला आहेस का?, असे विचारल्यानंतर आरोपी प्रथमत: नाही म्हणतो. सोलापुरात तर बरेच गुन्हेगार पहिल्यांदा आपल्या नेत्यांची ओळख सांगतात. आराेपी ऐकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मग मात्र पोलीस भाग्यवान पट्टा हातात घेतात. भाग्यवान पट्टा हातावर पडल्यानंतर मग मात्र त्याला पोलीस काय विचारतात ते समजते. मी-मी म्हणणाऱ्यांची भाषा बदलते अन् सत्य तोंडातून येते. काही पोलीस ठाण्यात भाग्यवान पट्टा तर काही ठिकाणी शुभ बोल नाऱ्या पट्टा असे संबोधले जाते. पट्ट्यावर तसे लिहून ठेवण्यात आले होते ; मात्र हे पट्टे आता पोलीस ठाण्यात दिसून येत नाहीत.
किती तडीपार, किती स्थानबद्ध?
वर्षे तडीपार स्थानबद्ध
- २०२० २४ ०८
- २०२१ ३५ १४
- २०२२ (फेब्रुवारी) ०८ ०२
कायदा, सुव्यवस्थेसाठी होते कारवाई
० शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाेलीस आयुक्तालयाच्या वतीने तडीपार व स्थानबद्ध (एमपीडीए) सारख्या कारवाया केल्या जातात. प्रत्येक पोलीस ठाण्याकडून तसा प्रस्ताव तयार केला जातो. तो वरिष्ठ अधिकारी, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या समोर ठेवला जातो. पोलीस आयुक्तांच्या सहीने तो मंजूर होऊन संबंधितांवर कारवाई केली जाते.