आप्पासाहेब पाटील
सोलापूर : वारंवार सूचना, आवाहन, मुदत देऊनही वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण कंपनी वेगात राबवित आहे. शहर व जिल्ह्यातील १६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीअभावी खंडित केला आहे. थकबाकीदारांनो वीज बिल भरा नाहीतर ऐन दिवाळीत तुम्हाला अंधारात बसण्याची वेळ येऊ शकते असा गर्भित इशारा महावितरण प्रशासनाने दिला आहे.
कोरोनाकाळात लाखो ग्राहकांनी आर्थिक अडचणी व इतर कारणे सांगून वीज बिलांचा भरणा केला नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या वीज बिल थकबाकीचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला. कोरोनाची परिस्थिती ओसरली, आता सर्वकाही सुरळीत झालेले असतानाही अनेक ग्राहक वीज बिल भरत नसल्याने महावितरणने कटू कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने सुरू केल्याने वीज बिल न भरणाऱ्या अनेकांची दिवाळी अंधारातच जाणार की काय अशी शंका वर्तविण्यात येत आहे.
-------------
अशी आहे स्थिती....
शहर
- एकूण थकबाकी - २९ कोटी ६३ लाख
- ग्राहक संख्या - ७८ हजार २०९
- वीज खंडित ग्राहक - ५ हजार ४८५
------------
ग्रामीण
- एकूण थकबाकी - ९८ कोटी ५० लाख
- ग्राहक संख्या - ३ लाख ५३ हजार ०८५
- वीज खंडित ग्राहक - ९ हजार ८६३
--------
घरगुती, कमर्शियल अन् इंडस्ट्रीयल ग्राहक रडारवर...
वीज बिल थकविणारे घरगुती, कमर्शिअल अन् इंडस्ट्रीयल ग्राहकांवर थकबाकीचा ठपका ठेवत वीजतोडणीची कारवाई सध्या महावितरणकडून सुरू आहे. पावसामुळे शेती पाण्यात गेली, मिळणारं उत्पन्न यंदा मिळाले नाही. आता वीज बिल कसं भरायचं असा प्रश्न कृषिपंप ग्राहकांसमाेर पडला आहे. त्यामुळे तूर्त महावितरणकडून कृषीपंप ग्राहकांवर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याचे सांगण्यात आले.
----------
पैसे असतानाही लोक वीज बिल भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. बिलं दिली, आवाहन केलं, नोटिसा पाठविल्या तरीही लोक वापरलेले वीज बिल भरत नसल्याने महावितरण वीजतोडणीची मोहीम राबवित आहे. चुकीचं बिल असल्यास दुरुस्त करु, जास्त बिल असल्यास हफ्त्यांनी भरण्याची सोय करून देऊ मात्र ग्राहकांनी वीज बिल भरलं पाहिजं.
- चंद्रकांत दिघे, शहर अभियंता, महावितरण, सोलापूर