सोलापूर : कोरोनानंतर रेल्वेची प्रवासी सेवा रुळावर आली आहे. सर्वच एक्स्प्रेस, पॅसेंजर, साप्ताहिक व डेमू गाड्या वेळेवर धावू लागल्या आहेत. रेल्वे मंत्रालयानेही रेल्वेच्या प्रवासातील सर्व निर्बंध कमी केले आहेत. प्रवास करताना रेल्वे तिकीट प्रवाशांजवळ असणे अनिवार्य केले असून, नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे प्लॅटफाॅर्म तिकीट असणे गरजेेचे आहे. प्लॅटफाॅर्म तिकीट नसलेल्या व्यक्तीला दंडात्मक कारवाईबरोबरच तुरुंगवासाची शिक्षाही होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
पूर्वीच्या काळी गाड्यांमध्ये डबे एकमेकांना जोडलेले नव्हते. अशा परिस्थितीत तिकीट तपासणी अधिकाऱ्यांना तिकीट तपासत असताना खूप त्रास व्हायचा. त्यानंतर प्रवासी ट्रेनमधून उतरल्यावर त्यांचे तिकीट तपासले जाईल आणि तिकीट नसलेले आढळल्यास दंड आकारला जाईल, असा नियम करण्यात आला होता, आजही तो कायम आहे. दरम्यान, त्यानंतर प्रवाशांची ओळख पटवण्यात अडचण आली. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफॉर्म तिकिटाचा नियम लागू केला, प्लॅटफॉर्म तिकीट काढल्याने प्रवाशास स्थानकावर असलेल्या सर्वच रेल्वे सुविधांचा लाभ घेता येऊ लागला आहे.
----------
अशी आहे शिक्षेची तरतूद
रेल्वेस्थानकात प्रवेश करण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. विना प्लॅटफाॅर्म तिकीट रेल्वेस्थानक परिसरात प्रवेश करणे हा रेल्वे ॲक्ट १४७ नुसार गुन्हा आहे. विना प्लॅटफाॅर्म तिकीट आढळलेला प्रवासी विनातिकीट म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. त्यासाठी १ हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. दंड न भरल्यास रेल्वे न्यायालयाकडून सहा महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
----------
प्लॅटफॉर्म तिकीट असेल तरच स्थानकावर प्रवेश...
अनेकवेळा लोक विनाकारण प्लॅटफॉर्मवर फिरताना दिसतात. अशा स्थितीत लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट घेणे बंधनकारक केले आहे. मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील सर्वच महत्त्वाच्या स्टेशनवर जाताना प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी प्लॅटफॉर्म तिकीट काढूनच स्थानकावर प्रवेश करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
---------
दररोज १२०० प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री
सोलापूर स्टेशन हे मध्य रेल्वे विभागातील सर्वात महत्त्वाचे स्टेशन म्हणून ओळखले जाते. या स्थानकावरून कर्नाटक, आंध्रप्रदेश, मराठवाड्यासह अन्य जिल्ह्यातील लोक याच स्टेशनवरून मुंबई, पुणे, हैद्राबाद, बंगळुरुसह अन्य महत्त्वाच्या शहरात जाण्यासाठी रेल्वेनं प्रवास करतात. सोलापूर रेल्वे स्थानकावर दररोज १२०० ते १३०० प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
----------
प्लॅटफॉर्म तिकीट नसलेल्या प्रवाशांवर रेल्वे न्यायालयात खटला चालविता जातो आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार १००० रुपये दंड किंवा ६ महिन्यांपर्यंत कारावास होऊ शकतो. दंड व कारवाई टाळण्यासाठी स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवासी व नातेवाईकांनी प्लॅटफॉर्म तिकीट काढूनच स्थानकावर प्रवेश करावा.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल