मोठी बातमी; काका साठे राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत; मोहोळच्या कार्यक्रमात दिले संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 10:49 AM2022-08-02T10:49:22+5:302022-08-02T10:49:28+5:30
अनगरच्या सभेत काका साठे यांचा नेतृत्त्वालाच इशारा
मोहोळ : गेली ३० वर्षे हा तालुका एकसंघ ठेवण्याचे काम राजन पाटलांनी केलं आहे. परंतु आता त्याला कुठंतरी डाग लावण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्यांना आम्ही श्रेष्ठी म्हणतो, ज्यांच्या विश्वासावर आम्ही काम करतोय, त्यांचं खाली लक्ष नाही. राजन पाटलांसह आम्ही एकनिष्ठेने काम करतोय, असं असताना एखाद्या कुठल्या तरी तुटक्या माणसाला वरिष्ठांकडून मदत मिळत असेल तर यातून तिसरेच निर्माण होईल, याचा पश्चाताप श्रेष्ठींना झाल्याशिवाय राहणार नाही. श्रेष्ठींनी वेळीच सावध व्हावे, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी अनगर येथील मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाला दिला.
अनगर येथे लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व पदाधिकाऱ्यांच्या आयोजित केलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अजिंक्यराणा पाटील, सागर चवरे, शहाजहान शेख, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, शौकत तलफदार, युवा नेते रामदास चवरे, उपाध्यक्ष हेमंत गरड, नानासाहेब डोंगरे, शिवाजी सोनवणे, सज्जन पाटील, जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक माळी उपस्थित होते.
यावेळी राजन पाटील म्हणाले, लोकनेते बाबुराव अण्णांनी संघर्षाच्या काळात तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून विविध संस्था उभ्या केल्या. या संस्था कागदावरच्या नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामे करणाऱ्या आहेत. अण्णांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आजही आमच्या तिसऱ्या पिढीच्या पाठीशी उभा आहे. सीना - भोगावती जोड कालव्यासह अनगर परिसरातील दहा गावांच्या पाण्याचा प्रश्नही शासनाच्या माध्यमातून मार्गी लागला असल्याचे सांगत आम्ही पवारांचा विचार घेऊन जाणारी माणसं आहोत, स्वाभिमान गहाण ठेवणारी माणसं नाहीत, असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
यावेळी प्रवक्ते महेश पवार, मुस्ताक शेख, विजय कोकाटे, धनाजी गावडे, राजाभाऊ सुतार, रामभाऊ कदम, प्रकाश कस्तुरे, अनिल कादे, सिंधुताई वाघमारे, रत्नमाला पोतदार, यशोदाताई कांबळे, अविना राठोड, अस्लम चौधरी, जालिंदर लांडे, दत्तात्रय पवार, अक्षय खताळ, अनंत नागनकेरी, भारत सुतकर, सज्जन चवरे, शिवाजीराव चव्हाण, राहुल मोरे, सचिन चवरे, मुकेश बचुटे, शकील शेख, प्रवीण डोके, रामराजे कदम, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
................
...अन्यथा पक्ष बदलण्याशिवाय पर्याय नाही
एकाच पक्षात राहून राजन पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. याबाबत आम्ही दोन वेळा राष्ट्रवादींच्या पक्षश्रेष्ठींशी बैठका घेतल्या. आता पुन्हा बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेणार आहोत, असे सांगत पक्षश्रेष्ठींनी वेळीच लक्ष दिले नाही, तर पक्ष बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी यावेळी दिला.