साेलापूर : शहराप्रमाणे ग्रामीण भागात काेराेनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाने केला. जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी आठ तालुके काेराेनामुक्त झाले. उर्वरित तीन तालुक्यात केवळ सहा सक्रिय रुग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात काेराेनाची लाट ओसरली आहे. पालिकेच्या आराेग्य विभागाने बुधवारी एकूण २१४ काेराेना चाचण्या केल्या. यातून एकही रुग्ण आढळून आला नाही. सध्या दाेन सक्रिय रुग्ण आहेत. हे रुग्ण घरातच राहून उपचार घेत असल्याचे आराेग्य अधिकारी डाॅ. बसवराज लाेहारे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाने बुधवारी ३९७ काेराेना चाचण्या केल्या. यातून एकही रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या २ जणांना डिस्चार्ज मिळाला. सध्या सहा सक्रिय रुग्ण आहेत. ८७ जण हाेम क्वारंटाईन आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची एकूण संख्या गुरुवारअखेर १ लाख ८६ हजार ३६ झाली. यापैकी १ लाख ८२ हजार ३०४ जण बरे झाले. मृतांची एकूण संख्या ३७२६ झाली. शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ६६२ झाली. यापैकी ३२ हजार १५५ जण बरे झाले. मृतांची एकूण संख्या १५०५ झाली.
---
माेहाेळ तालुक्यात तीन सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात सहा सक्रिय रुग्ण आहेत. यात माढा तालुक्यात १, माेहाेळ तालुक्यात ३ तर सांगाेला तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. दक्षिण साेलापूर, पंढरपूर, उत्तर साेलापूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, बार्शी, अक्कलकाेट तालुक्यात नव्याने रुग्ण आढळून आलेला नाही. सक्रिय रुग्णही नाहीत.
--
शहरातील लसीकरणाची माहिती
महापालिका क्षेत्रात १८ वर्षांवरील ९१ टक्के नागरिकांनी काेराेना लसीचा दुसरा डाेस घेतला. दुसरा डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण ६८.८ टक्के आहे. १५ ते १८ वयाेगटातील ६६ टक्के मुलांनी काेराेनाची लस घेतली आहे.