सोलापूर : केंद्र सरकारने खतावरील सबसिडी कायम ठेवल्यानंतरही जिल्ह्यातील खत दुकानदारांनी चढ्या दराने खत विक्री केल्याचे आढळून आल्याने कृषी विभागाने १२ दुकानांचे परवाने बुधवारी निलंबित केले आहेत. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत सुटीच्या दिवशी दुकानाची कृषी विभागाने अचानकपणे तपासणी करून शेतकऱ्यांना नडणाऱ्या दुकानदारांना दणका दिला आहे.
‘अनुदान मिळूनही जुन्या किमतीत खतं मिळेना, गावपातळीवर चढ्या दरानेच विक्रीचा हट्ट संपेना’ या मथळ्याखाली लोकमतच्या हॅलो सोलापूरमध्ये बुधवारी खत विक्रीच्या वस्तुस्थितीबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दखल घेतली. सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना खत दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील खत दुकानांची गुणवत्ता विभागाने बुधवारी अचानकपणे तपासणी केली. यामध्ये बारा दुकानांचे व्यवहार संशयास्पद आढळले. त्यामुळे या कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी सांगितले.
खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. अशात केंद्र शासनाने खतांवरील सबसिडी कायम ठेवल्याने खताच्या किमती कमी झाल्या आहेत. शेतकऱ्यांची युरियाला जास्त मागणी असते. त्यामुळे सबसिडीवर युरियाचा पुरवठा होतो. यामुळे दुकानदारांना युरियाची विक्री पॉश मशीनवर बंधनकारक केली आहे. यासाठी पॉश मशीनवर शेतकऱ्याचा आधार क्रमांक नोंदणे गरजेचे आहे. असे असताना १२ दुकानदारांनी शेतकऱ्यांना युरियाची विक्री करून पॉस मशीनवर नोंद न घेतल्याचे आढळले. याचा अर्थ या दुकानदारांनी जुन्याच वाढीव दराने खत विक्री सुरू ठेवल्याचे स्पष्ट होत असल्याचा अभिप्राय खत निरीक्षकांनी नोंदविला आहे. अशी नोंद न झाल्यास जिल्ह्याला भविष्यात युरियाचा पुरवठा कमी होऊ शकतो. कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे व खते खरेदी केल्यावर पक्के बिल देणे बंधनकारक आहे. पक्के बिल दिल्याशिवाय शेतकऱ्यांनी खते व बियाणांची खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी माने यांनी केले आहे.
या दुकानांचा परवाना निलंबित
मल्लिकार्जुन खत विक्री केंद्र, बोरगाव, अक्कलकाेट, पद्मावती ॲग्रो एजन्सी, अक्कलकोट, राजेश्वरी कृषी भांडार, दुधनी, शहा कृषी भांडार, करजगी, गजानन कृषी केंद्र, कंदलगाव, गणेश कृषी केंद्र, मंद्रुप, लक्ष्मी कृषी केंद्र सादेपूर, उत्कर्ष कृषी भांडार, मंद्रुप, माळसिद्ध कृषी केंद्र, तेलगाव, उत्तर सोलापूर, राहुल कृषी केंद्र, टेंभुर्णी, झुआरी फार्म हब, म्हाळुंग, फताटे उद्योग केंद्र, सोलापूर.