पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या पावसाने भंडीशेगाव येथील पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाचा एका बाजूचा अर्धा भाग खचला आहे आणि जागोजागी खड्डे पडले आहेत. वरचा बहुतांश भाग वाहून गेल्याने मागील १२ तासांपासून पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. गुरुवार आणि शुक्रवारी तालुक्यातील भाळवणी, भंडीशेगाव सर्कल मध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कासाळ ओढ्याला पूर आला आहे. या ओढ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पूर आल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.
२०११-२०१२ साली नव्याने बांधण्यात आलेल्या भंडीशेगाव येथील पुलावरून हिल्यांदाच पाणी वाहिले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर - अकलूज, माळशिरस या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी शुक्रवारी रात्री उशिरा या ओढ्यावरील पाण्याची पाहणी करून वाहतूक बंद केली होती.
शनिवारी सकाळी पुराचे पाणी ओसरले असले तरी पुलाचे मोठे नुकसान झाले आसल्याचे प्रशासनाचया निदर्शनास आले आहे. शनिवारी सकाळी तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी पुलाची पाहणी केली. पुलाचे मोठे नुकसान झाले असून आज दिवसभर वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. पुलाची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे. अन्यथा धोकादायक अवस्थेतील पुलावरून वाहतूक सुरू केल्यास एखादी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त आहे.