मंगळवेढा : सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वाची बांधणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील सरसावले आहेत. सोलापूर येथील काँग्रेस भवनमध्ये महिला जिल्हा अध्यक्षा शहानवाज शेख, माजी आमदार रामहरी रुपनवर प्रमुख उपस्थितीत होते. नव्या नेतृत्त्वाला संधी, पक्षाच्या बळकटीकरणाचे दुवे साधत व पक्ष मजबूत करण्याचेही काम त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू केले आहे. या संदर्भातच ही बैठक आयोजित केलीली होती. या बैठकीमध्ये मंगळवेढा नगर परिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी येत्या नगर पालीकेच्या निवडणूकीमध्ये आपण काँग्रेस पक्षाच्यावतीने सर्व जागा लढवू असा निर्धार केला आहे.
गेली अनेक वर्षे देशाचे माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवेढ्यामध्ये चंद्रकांत घुले आणि त्यांचे कार्यकर्ते काम करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वावर निष्ठा ठेवून त्यांनी अनेकवेळा सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभूतपूर्व अशा आरोग्य शिबीरांचे आणि मोफत औषध वाटपाचे कार्यक्रमे केले. जनतेच्या मदतीला धावून जात, नागरिकांच्या समस्यांचे निराकारण करत त्यांनी जनतेशी संवादी नेतृत्त्व केले आहे. सध्या सत्तेत असणारे उपनगराध्यक्ष असून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी आपण बांधील राहून काम करू असा विश्वास या बैठकीत व्यक्त केला.
या बैठकीस कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अॕड. नंदकुमार पवार, मारुती वाकडे, अविनाश शिंदे, राहुल टाकणे, दगडू जाधव, मुललीधर घुले, राजाराम सुर्यवंशी, सचिन शिंदे, दिलीप जाधव, नाथा ऐवळे, बापू अवघडे, सुनीता अवघडे, संजय वाघमोडे, परमेश्वर वाघमोडे, अण्णा ताड, अण्णा आसबे, संदीप फडतरे त्याच बरोबर पक्षाचे नेते , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवेढा नगर परिषदेची येऊ घातलेली निवडणूक, धडाडीने कार्य करण्याची धवलसिंह मोहिते पाटील यांची पद्धत, पक्षाला उर्जा मिळवून देणारा हा निर्धार निवडणूकीचे वारे बदलणारा ठरेल. त्यामुळे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांच्या निर्धाराने नेते, कार्यकर्ते आणि राजकीय पटलावर अनेकांच्या चर्चा रंगतील.