सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या निवड समितीच्या अधिकाऱ्यांनी आज तालुक्यातील वाखरी, कासेगाव,रांझणी येथील जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिर्जे यांनी प्रस्तावित एमआयडीसीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा समावेश करून प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळाकडे सादर करावा असे, सांगितले.
यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, महावितरणचे अभियंता रवींद्र भुतडा, दिलीप धोत्रे, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच एमआयडीसीचे उपअभियंता श्री.मगर, सर्व्हेअर भारत भांजे, जयेश त्रिभुवन व संबंधित गावचे मंडल अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
यावेळी आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रस्तावित एमआयडीसी साठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता तात्काळ करण्यात येईल असे सांगितले. तर प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी प्रस्तावित एमआयडीसीसाठी उपलब्ध जागा व सुविधा बाबतची माहिती यावेळी दिली.