सोलापूर : जिल्हा राष्ट्रवादीच्या तक्रारीवर जिल्हा परिषदेतील मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांनी प्रकरणाची सुनावणी सुरुवातीपासून घ्या, अशी मागणी केलेला अर्ज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी फेटाळून लावला. तसेच मोहिते-पाटील गटाने नवीन पुरावा दाखल केल्यास युक्तिवाद करण्याचा अधिकार राखून ठेवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षादेश बजावूनही मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले यांचे सदसत्व रद्द करण्याची तक्रार राष्ट्रवादीचे अध्यक्ष बळिराम साठे यांनी केली आहे. न्यायालयीन सुनावणीनंतर हे प्रकरण पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आले आहे.
मोहिते-पाटील गटातर्फे ॲड. दत्तात्रय घोडके, ॲड. अभिजित कुलकर्णी, ॲड. नितीन खराडे यांनी सुरुवातीपासून पुन्हा या प्रकरणावर सुनावणी घ्यावी म्हणून अर्ज दिला होता. राष्ट्रवादीचे वकील ॲड. उमेश मराठे, ॲड. इंद्रजित पाटील, ॲड. बाबासाहेब जाधव यांनी न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्याने नव्याने सुनावणी घेण्याची गरज नाही, असा विरोध केला होता. त्यावरून मोहिते-पाटील गटाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला. याचबरोबर नवीन पुराव्यावर युक्तिवाद करण्यासाठी हक्क राखून ठेवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला. अर्ज फेटाळण्यात आल्याने आता अंतिम सुनावणीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
२७ ऑगस्टला सुनावणी
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आता पुढील सुनावणी २७ ऑगस्टला नेमली आहे. मोहिते-पाटील गटाने मागणी केल्याप्रमाणे १० ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेसने ७६ पानी घटना दाखल केली आहे. पुढील सुनावणीत नवीन मुद्दा काय येणार हा चर्चेचा विषय झाला आहे.