सोलापूर: राज्यातील साखर हंगामाला अद्यापही गती मिळाली नाही. एकूण १३६ कारखान्यांचे ९७ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडे कोल्हापूर विभागात ३१ कारखाने सुरू असल्याचे दिसत असले तरी सर्वाधिक २३ कारखाने सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत.
राज्यातील २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यापैकी १७६ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. सुरू झालेल्या १३६ कारखान्यांमध्ये कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३१ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. त्यानंतर सोलापूर(सोलापूर व उस्मानाबाद) व पुणे( पुणे व सातारा) विभागातील प्रत्येकी २४, अहमदनगर( अहमदनगर व नाशिक) विभागातील २३, औरंगाबाद (औरंगाबाद, धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, बीड) १९, नांदेड ( नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर) १३ तर अमरावती( बुलढाणा, अमरावती, यवतमाळ) विभागातील दोन साखर कारखाने सुरू झाले आहेत.
बुधवारपर्यंत राज्यातील १३६ कारखान्यांचे ९७ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून ७८ लाख मेट्रिक टन साखर तयार झाली आहे. ८.०७ टक्के इतका उतारा पडला आहे. साखर आयुक्तांच्या अहवालानुसार कोल्हापूर विभागात सर्वाधिक ३१ तर सोलापूर विभागात २४ कारखाने सुरू आहेत. मात्र, प्रत्यक्षात एकट्या सोलापूर जिल्ह्यात २३ कारखाने सुरू झाले आहेत.
सोलापूर जिल्हा आघाडीवर..
एफआरपी थकविणाऱ्या, शासकीय देणी न देणाऱ्या इतर देणी थकविणाऱ्या २४ साखर कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्तांनी पेंडींग ठेवले आहेत. यामध्ये सोलापूर विभागातील १० तर सोलापूर जिल्ह्यातील ९ व उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे.
साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील २० व सोलापूर जिल्ह्यातील १६ कारखाने सुरू झाले आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २३ साखर कारखाने सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील २३, कोल्हापूर २०, अहमदनगर १९, पुणे १५ तसेच सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी ११ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे.