मंगळवेढा : राज्यभर गाजलेल्या माचणूर(ता मंगळवेढा)येथील नऊ वर्षीय प्रतीक शिवशरण या बालकाच्या नरबळी प्रकरणी गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ जेलमध्ये असणारे श्री संत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब डोके यांचे पुणे येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. प्रतीक शिवशरण या इयत्ता तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या बालकाचे २६ ऑक्टोबर २०१८ मध्ये अपहरण केले होते त्याचे अपहरण करून गावाजवळील उसाच्या फडात हत्या केल्याचे उघडकीस आले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी सखोल तपास करून ही हत्या नसून नरबळी असल्याचे उघडकीस आणून या प्रकरणाचा उलगडा केला होता. प्रतिक या बालकाचा गुप्त धनाची प्राप्ती आणि कुंटूंबाच्या रोगमुक्तीसाठी नरबळीच्या गुन्हयात श्रीसंत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब डोके यांना शुक्रवार दि १२ जानेवारी २०१९ रोजी मंगळवेढा पोलिसांनी अटक केली होती.
नरबळीचा हा विकृत आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सरकारी पक्षाने करावी, अशी फिर्यादीचे वकील किर्तीपाल सर्वगोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. चार वेळा न्यायालयाने जामीन नामंजूर केला होता. सरकारतर्फे अॅड.सारंग वांगीकर मूळ फिर्यादीतर्फे अॅड. अनिकेत निकम,अॅड. किर्तीपाल सर्वगोड अॅड.एस. एन. झिरपे, अॅड.ओंकार बुरकुल यांनी काम पाहिले होते. जेलमध्ये असताना नानासाहेब डोके यांना विविध आजारांनी ग्रासले होते, त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान न्यायालयीन कोठडीत निधन झाले.