सोलापूर : उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्याविरुद्ध तीन सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला.
दीड वर्षांपूर्वी भडकुंबे यांची सभापती पदी निवड झाली होती. भडकुंबे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गोटातून निवडून आल्या होत्या. सभापती निवडीवेळी त्यांनी भाजपला धक्का देऊन माने गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे गटाने साथ दिली होती. दीड वर्षातच राष्ट्रवादीने माने गटाला धक्का दिला आहे. भडकुंबे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. उत्तर सोलापूर पंचायत समितीमध्ये एकूण चार सदस्य आहेत. यापैकी भाजपच्या संध्याराणी पवार, राष्ट्रवादीचे जितेंद्र शीलवंत आणि हरिदास शिंदे यांनी भडकुंबे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आहे.