सोलापूर : ‘माझे गाव कोरोनामुक्त’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावातील दुकानदारांना मास्क नसेल तर दुकानाचा परवानाच रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा टप्पा संपल्यानंतर जिल्हा परिषदेने ‘माझे गाव कोरोनामुक्त’ ही मोहीम हाती घेतली आहे. गावे कोरोनामुक्त करण्याच्या मोहिमेचे उद्दिष्ट असून, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गावातील प्रत्येकाने मास्क घातलाच पाहिजे. रस्त्यावर विनामास्क आढळणाऱ्यांना ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि आरोग्य सेवकांमार्फत तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्यांदा दुकानदार, रस्त्यावरील भाजीविक्रेते, बसस्थानक, सरकारी कार्यालयात येणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून १५ डिसेंबर रोजी सर्व गावात आरोग्य व ग्रामपंचायत विभागामार्फत प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर रोजी ७ गावात या मोहिमेला सुरुवात करण्यात येईल. जिल्ह्यात अद्यापही कोरोना रुग्ण आढळत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा तपासणी करण्यात येईल. नवीन वर्षात ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण अत्यंत कमी करण्यावर भर असेल, असे स्वामी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव उपस्थित होते.
अठरा वेळा तपासणी केली
खोकलले तरी नागरिक घाबरतात, म्हणून आंबट पदार्थ वर्ज्य केले. लोकांमध्ये मिसळण्यासाठी १८ वेळा कोरोना चाचणी केल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे शंका आली की चाचणी करा व कोरोनाला घाबरू नका, असे आवाहन यावेळी केले.