कुर्डूवाडी : माढा पोलिसांना धक्काबुक्की करून तहसील आवारत असणाऱ्या सबजेलमधून सोमवारी पळून गेलेल्या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपीपैंकी एकजण महातपुर गावातील उसाच्या फडात लपून बसल्यानंतर त्याच्या पाऊल खुणावरून पोलिसांनी सोमवारीच त्याला ताब्यात घेतले तर त्यातील पोस्को कायद्यांतर्गत कोठडीत असणारा दुसरा आरोपी तानाजी लोकरे याला मंगळवारी सकाळी ९ च्या दरम्यान कुर्डूवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून आरोपी रेल्वेने पुण्याकडे जाण्याच्या तयारीत असताना पकडला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, दत्ता सोमवाड, नितीन गोरे, सिद्धनाथ वल्टे यांच्या पथकाने केली आहे. तानाजी लोकरे हा आरोपी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातील एका पोस्को गुन्ह्यातील आरोपी असून माढा येथील सबजेलमधून प्लॅन करून पळाल्यानंतर तो पुन्हा कुर्डूवाडी पोलिसांच्याच ताब्यात आला आहे. त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
सबजेलमधून पळालेल्या चार आरोपीपैंकी अवघ्या २४ तासात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे.