सोलापूर : महानगरपालिकेच्या रस्त्यावरून धावणाऱ्या स्क्रॅप गाड्या बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी दखल घेत अशा गाड्यांचा वापर करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
अतिक्रमण विभागासाठी वापरण्यात येणारी गाडी, अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून वापरण्यात येणारा पाण्याचा टँकर दोन्ही गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी शहरातील अन्य सरकारी कार्यालयांतर्गत चालणाऱ्या स्क्रॅप गाड्या बंद झाल्याचे दिसत नाही. अशा गाड्या बंद करण्यासाठी शहर वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी केले जात आहे.
अन्य सरकारी कार्यालयांचे काय?
शहरांमध्ये पोस्ट कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महसूल विभाग, पोलीस आयुक्तालय आदी विविध सरकारी कार्यालयांमध्ये वाहनांचा वापर होत असतो. मात्र ही वाहने गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरून धावत असतात. महाराष्ट्र शासन लिहिलेल्या अशा अनेक गाड्या आहेत. नाव पाहून अशा वाहनांची चौकशी केली जात नाही.