सोलापूर : मंगळवेढ्यातील संजय आवताडे यांच्या घरात ३५ लाख २६ हजार १०६ रुपये किमतीचे दागिने चोरलेल्याचोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. हा चोरटा बावीस एकर शेतीचा मालक निघाला.
सर्वेश्वर दामू शेजाळ (वय ३५, रा. गोणेवाडी, ता. मंगळवेढा, सध्या रा. दुर्गामातानगर, मंगळवेढा) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. दि. १० जानेवारी रोजी उद्योगपती संजय महादेव आवताडे (रा. खंडोबा गल्ली, मंगळवेढा) यांच्या नवीन घराची वास्तुशांती होती. त्यामुळे फिर्यादी विनायक माधवराव यादव (वय ४१, रा. मारापूर, ता. मंगळवेढा) हे सहकुटुंब त्यांच्या घरी आले होते. घरातील सर्व लोक आरतीसाठी खालच्या हॉलमध्ये गेले. दरम्यान पाहुण्यांनी आपल्या बॅगा पहिल्या मजल्यावरील रूममध्ये ठेवल्या होत्या. सर्व पाहुणे गळाभेट करून जेवण झाल्यानंतर पुन्हा पहिल्या मजल्यावर गेले असता, विनायक यादव यांनी आणलेली बॅग उघडी असल्याचे दिसून आले.
बॅगेतील सोन्याचे दागिने दिसून आले नाही. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यांमध्ये दि.१२ जानेवारी रोजी फिर्याद देण्यात आली होती. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावले, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख, तसेच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुंजवटे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पार पडली.
लहान मुलीने केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे पटली ओळख
आवताडे यांच्या घरात पहिल्या मजल्यावर खोलीमध्ये एका लहान मुलीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी बंगल्याच्या बाहेर आले, तेव्हा काही अंतरावर त्यात निळा रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती उभा असलेला पोलिसांच्या लक्षात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी त्याच्याकडे संशयाने पाहत असताना त्याने तेथून पळ काढला. त्याचा पाठलाग करून सर्वेश्वर शेजाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तब्बल दोन दिवस त्याने चोरी केली नसल्याचे सांगत होता. मात्र, शेवटी शेतामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले सोने काढून दिले.