सोलापूर : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी झाले. पंढरपूर रेल्वे स्थानकासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. या रेल्वे स्टेशनच्या नुतनीकरणातून स्टेशनचा कायापालट होऊन पंचतारांकित व्यवस्था सामान्य प्रवाशाला मिळतील. यातून भविष्यात व्यापार वृद्धी देखील होताना पाहायला मिळणार आहे.
अमृत भारत स्टेशन अंतर्गत पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजन सोहळा आज झाला. यावेळी दिल्लीतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. या कार्यक्रमास आ. हरिभाऊ बागडे, आ. समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले आदी रेल्वेचे अधिकारीही उपस्थित होते.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने मागील ९ वर्षात ७ राष्ट्रीय महामार्गाशी जोडले गेले आहे. आता रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणानंतर ते देशपातळीवर जाईल. रेल्वे आणि रस्ते विकास झाल्यामुळे पंढरपूरच्या विकासाला चालना मिळाली असून याचा लाभ भाविकांसह शेतकऱ्यांनाही होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पंढरपूर हे देशपातळीवर एक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरु झाल्याचे आ. आवताडे म्हणाले. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ मंडळ यांत्रिकी अभियंता राहुल गर्ग, मुख्य वाणिज्य निरीक्षक एच व्ही चांगण, ए डी एन जनार्दन प्रसाद, मुख्य पर्यवेक्षक रमेश काळे, स्टेशन प्रबंधक चनगौडर, रेल्वे पोलीस निरीक्षक जाधव आदींसह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.