मिलिंद राऊळ
सोलापूर : शहर, जिल्हा तसेच इतर जिल्ह्यांतून अनेक रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतात. त्यामुळे ओपीडीत नेहमीच गर्दी असते. या गर्दीतही ओपीडीमध्ये जाऊन काहीजण वाहन पार्क करत असल्याचे चित्र दररोज दिसत आहे. यामुळे रुग्णसेवेस अनेकदा अडचणी येतात.
सिव्हिल हॉस्पिटलमधील ओपीडीच्या बाहेर एक फलक लावला आहे. या फलकावर रुग्णालयाच्या आवारात खासगी रुग्णवाहिका, रिक्षा तसेच इतर वाहने लावण्यास मनाई करणारा मजकूर लिहिला आहे. वाहने लावल्यास कडक कारवाई करू, असा इशारा दिला आहे. तरीही ओपीडीमध्ये जिन्याच्या खाली, ओपीडीचे गेट आणि रुग्णांना मदत करण्यासाठी असलेल्या समन्वय कार्यालयासमोरही वाहने लावलेली दिसून येतात. यामुळे अनेकदा अडचण निर्माण होते. रुग्णालयात अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात. ते रुग्णांना शिस्त लावतात. त्यांच्या देखतही थेट ओपीडीमध्ये पार्किंग होत आहे.
रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात आल्यानंतर त्यांची वाहने पार्क करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांच्याकडून पार्किंगचे पैसेही घेतले जातात, तर दुसरीकडे थेट ओपीडीमध्येच पार्किंग करण्यात येत आहे, याबद्दल रूग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डॉक्टरांकडूनही उल्लंघन!
रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक वाहने बाहेर पार्क करत असताना रुग्णालयातील कर्मचारी तसेच काही डॉक्टरच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे एका रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले. रुग्णालयात वाहने पार्किंग करण्यासाठी जागा असताना आत वाहने पार्क करण्याची गरजच काय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.