पंढरपूर : पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानाच्या गेटजवळील रस्त्याच्याकडेला बंदूक घेऊन फिरणाऱ्या दोघांना पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोन जिवंत गोळ्या व एक बंदूक जप्त केली आहे.
रेल्वे मैदानाच्या जवळ स्वप्नील अरुण आयरे (मूळ रा. चिलाईवाडी, ता. पंढरपूर, सध्या रा. संभाजीचौक, संतपेठ, पंढरपूर) व अंबादास सुरेश पाटोळे (रा. रमाईनगर पाण्याचे टाकीजवळ पंढरपूर, ता. पंढरपूर) बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती सपोनि. सी. व्ही. केंद्रे यांना मिळाली आहे. त्यानुसार त्यांनी तेथे तत्काळ पथक पाठवले.
त्यावेळी दोघांपैकी स्वप्निल आयरे हा त्याच्या कमरेस अधुन-मधुन हात लावुन इकडुन तिकडे फेऱ्या मारत होता. एकंदरीत त्याच्या हालचालीवरुन त्याने त्याच्या कमरेस कोणतेतरी हत्यार लावले असल्याची पोलिसांची खात्री झाली आहे. लगेचच पथकाने त्या दोघांना घेराव करून ताब्यात घेतले. यावेळी स्वप्नील अरुण आयरे (मूळ रा. चिलाईवाडी, ता. पंढरपूर, सध्या रा. संभाजीचौक, संतपेठ, पंढरपूर) याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.