पंढरपूर/सोलापूर : माघी यात्रेतील दशमी व एकादशी दिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे. यात्रेतील गर्दी टाळण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत पोलीस व प्रशासनामध्ये चर्चा सुरु आहे. माघी एकादशी दिवशी एक दिवस संचारबंदी करण्याबाबत ही चर्चा सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
माघी यात्रा देखील पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भरते. मात्र मागील तीनही यात्रा रद्द झाल्या आहेत. यामुळे या यात्रेत प्रत्येक यात्रेच्या तुलनेने अधिक प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील लोकांची पंढरीत गर्दी झाली नाही, तर कोरोनावर आपल्याला मात करता येईल. आणि पुढील यात्रा सर्वांना खूप चांगल्यारितीने करता येतील असे जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येणारी माघी यात्रा कशी असेल असा प्रश्न विचारल्यानंतर तेजस्वी सातपुते 'लोकमत'शी बोलत होत्या.
पुढे सातपुते म्हणाल्या, माघी यात्रेला ही इतर जिल्ह्यातून दिंडी येतात. त्यातील काही दिंड्या मोठ्या असतात. यामुळे भाविकांची गर्दी पंढरपूरात होणार. अधिक कोरोनाचा प्रसार होणार. यामुळे सर्वांना कोरोनाचा धोका निर्माण होणार. गर्दी टाळणे, अंत्यत आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनावर कन्ट्रोल आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. लवकर कोरोना मुक्त व्हायचे असेल. तर आणखी काही काळ नियम पाळणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांनी देखील मंदिरात गर्दी करणे टाळले पाहीजे. त्याचबरोबर बाहेरचे लोक मंदिरात आले नाही. तर कोरोनावर आपल्याला मात करता येईल.
यामुळे जिल्हा प्रवेश मार्ग, पंढरपूर तालुका प्रवेश मार्गावर पोलीसांची नाकाबंदी करण्याबाबत व कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्याच्या दृष्टीने विचार सुरु आहे. कार्तिकी व आषाढी यात्रा मर्यादित स्वरुपाची झाली. त्याचपध्दतीने माघी यात्रा देखील मर्यादित स्वरुपाची होेणे गरजेचे असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले