सोलापूर : राज्य शासनाने 20 ऑक्टोबर 2021 पासून महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाने महाविद्यालयात नियमीत वर्ग सुरु न करता सुरुवातीला फक्त प्रॅक्टीकलचे वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यापीठ व संलग्न महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. त्यानुसार महाविद्यालयातील थेअरी तासिका पुर्वीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने सुरु असणार आहेत. मात्र प्रात्यक्षिक वर्ग, प्रोजेक्ट वर्क, फिल्ड वर्क आदी शैक्षणिक बाबी या ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत. यासाठी एका बॅचमध्ये फक्त 20 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. कोविड -19 चे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. महाविद्यालयांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयांना कोविड 19 संबंधित शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालय सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत. या बैठकीस प्र कुलगुरु डॉ. डी.एन. मिश्रा, प्र. कुलसचिव डॉ. सुरेश पवार, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर, डॉ. व्ही. बी. पाटील, डॉ. विकास घुटे, डॉ. माया पाटील, डॉ. अभिजीत जगताप, डॉ श्रीराम राऊत, डॉ. अंजना लावंड आदी उपस्थित होते.--------