साेलापूर: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेमध्ये माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय पटलावर बरीच चर्चा झाली; पण आमदार बबनराव हे परदेशातून मुंबईत परतत असल्याने ते विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत; तर आमदार प्रणिती या घरगुती कार्यक्रमात सहभागी असल्याने सहभागी होऊ शकल्या नाहीत, अशी कारणं सांगण्यात आली.
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची हाेती. शिवसेनेत माेठी फूट पडली. सांगाेल्याचे आमदार शहाजीबापू पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासाेबत आहेत. आघाडीतील इतर आमदार काेणाला मतदान करतात याकडे लक्ष हाेते. अपक्ष आमदार संजयमामा शिंदे, राष्ट्रवादीचे माेहाेळचे आमदार यशवंत माने यांंनी आघाडीचे उमदेवार राजन साळवी यांना मतदान केले. भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राउत यांनी ठरल्याप्रमाणे राहुल नार्वेकर यांनाच मतदान केले.
दरम्यान, आमदार बबनराव शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांची अनुपस्थिती हाेती. आपण परदेश दाैऱ्यावर हाेताे. रविवारी दुपारी मुंबईत पाेहाचलाे. या दाैऱ्याबद्दल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांना कल्पना हाेती. साेमवारी मात्र अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे बबनराव शिंदे यांनी सांगितले. प्रणिती शिंदे घरगुती कार्यक्रमामुळे अनुपस्थित असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.