सोलापूर - येत्या नवीन वर्षात सोलापुरात तब्बल २९ वर्षानी महाराष्ट्र विरूध्द मणिपूर हा रणजी क्रिकेट सामना होणार आहे. सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडयिम (पार्क) वर ५ ते ८ जानेवारी २०२४ या चार दिवसाच्या कालावधीत हा सामना होणार असल्याची माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्मार्ट सिटी व सोलापूर महानगरपालिकेच्या मदतीतून मैदान सुशोभिकरण केले आहे. सुशोभिकरण, नूतनीकरणानंतर या मैदानावर राष्ट्रीय सामने होत आहेत. कुच बिहार ट्राॅफी व अन्य महत्वाचे क्रिकेट सामने या मैदानावर यशस्वी झाले आहेत. याशिवाय मागील दोन महिन्यांपूर्वी पावळ्सात क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र रणजी २३ वर्ष वयोगटातील संघासाठी सराव शिबीराचे आयोजन केले होते. त्यावेळी केलेले उत्कृष्ट नियोजनामुळे महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनने हा रणजी सामना सोलापुरात घेतला आहे. या पत्रकार परिषदेस संघटनेचे अध्यक्ष दिलीप माने, संयुक्त सचिव धैर्यशील मोहिते-पाटील, चंद्रकांत रेम्बुर्स, उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, व्हा. चेअरमन श्रीकांत मोरे, खजिनदार संतोष बडवे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रणजी सामना सोलापुरात होत असल्याने यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. स्वागत समिती, कार्याध्यक्ष, सामना समिती सचिव, क्रिडांगण समिती, भोजन, निवास, वाहतूक, साफसफाई देखरेख समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक समितीमध्ये विविध पदाधिकारी नियुक्त केले आहेत.