सोलापूर : मराठी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त पोस्टचे समर्थन करणारे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोमवारी धावून गेले. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला.
केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. चितळे अटकेत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकीच्या वक्तव्याचे समर्थन केले. सदाभाऊ सोमवारी दुपारी दोन वाजता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रशांत बाबर, विद्यार्थी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सुहास कदम यांच्यासह कार्यकर्ते टाळ मृदुंग घेऊन विश्रामगृहात पोहोचले. सदाभाऊंना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. सदाभाऊंच्या बॉडीगार्डने त्यांना रोखले. बराच वेळ झटापट झाली. बाहेर आल्यानंतर ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध निदर्शने केली.
------------
मी असे बोललोच नाही -राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सदाभाऊ आणि सोबतचे कार्यकर्ते भेदरून गेल्याचे पाहायला मिळाले. मी केतकी चितळे हिने शरद पवार यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त पोस्टचे समर्थन केले नाही. ती न्यायालयात कणखरपणे उभी राहिली हे सांगण्याचा प्रयत्न मी करत होतो, असे सदाभाऊ बोलून गेले.