सोलापूर - विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची मोहीम वेगात सुरू आहे. एका दिवसाच्या तपासणी मोहिमेत ३२४ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्या प्रवाशांकडून १ लाख ७१ हजार ६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (कोविड १९ च्या दुसऱ्या चेन ब्रेक करण्याकरिता) म्हणून मध्य रेल्वेमधीलसोलापूर विभागांत विविध उपाययोजना बनविल्या आहेत. विशेष गाड्या प्रवाशांच्या सुविधांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांत सर्व कोचेस आरक्षित करण्यात आले आहे. या गाड्यांत कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना प्रवास करता येतो. शनिवारी (दि. १४) पुणे-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस आणि नवी दिल्ली-बंगलोर विशेष एक्स्प्रेस अहमदनगर-कोपरगाव आणि कोपरगाव-अहमदनगर सेक्शनदरम्यान मध्य रेल्वेच्या सतर्कता पथकास आणि तिकीट तपासणी पथकाने संयुक्त रेल्वेगाड्यात तपासणी मोहीम राबविली.
------------
वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेने विशेष व नियमित गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात येता या वर्षातील जानेवारी ते आजपर्यंत अशा १२ तपासण्या झाल्या आहेत. त्यातून रेल्वेने ६ लाख ४४ हजार ७९० रुपयांचा दंड वसूल केला.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी अशा अधिक संयुक्त तपासण्या केल्या जातील. रेल्वे प्रशासान आवाहन करते की, सर्व प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल.