सोलापूर : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राज्यभरात त्यांनी आपला विस्तार करायला सुरुवात केली आहे. सोलापुरात सुद्धा आता नवीन आराखडा तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दुपारी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात शहर आणि जिल्ह्यातील शिंदे सेनेचे नवीन पदाधिकारी निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला अमोल शिंदे, मनोज शेजवाल, अनिकेत पिसे, गायकवाड, तुकाराम मस्के, हरिभाऊ जाधव यांच्या सह मनीष काळजे तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम पदाधिकारी निवडीचा श्री गणेशा करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
दरम्यान प्राध्यापक शिवाजी सावंत हे शासकीय विश्रामगृहात असल्याचे समजताच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सुद्धा प्राध्यापक सावंत यांची भेट घेतली आणि प्राध्यापक सावंत यांनी आमदार राऊत यांचा यथोचित सन्मान केला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शिंदे सेनेचे पदाधिकारी निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, त्यानंतर खऱ्या अर्थाने आगामी सोलापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला रणनीती आखण्यात येणार आहे.